*जिच्या हाती पाळण्याची दोरी* .....

*जिच्या हाती पाळण्याची दोरी* .....


       अण्णा ! ए अण्णा....वैभवच्या हाकेनं अण्णा भानावर आला. साठी ओलांडलेला अण्णा शरीरानं धडधागट असला तरी मनानं पार खंगला होता.नियतीसमोर पार लुळा पडला होता. "रकमा आये....अगं... बघ की...हा अण्णा कसा करतोय..." वैभव घाबरून म्हणाला. कसबसं स्वतःला सावरत डोळे किलकिले करत अण्णा सावध झाला, वैभूच्या डोक्यावरून हात फिरवू लागला... 
"गुणाचं माझं पोरं..."असं म्हणत थरथरत्या हाताने वैभवला जवळ घेवून कुरवाळू लागला व  त्याच्या कपाळाचा मुका घेता घेताच ढसढसा रडू लागला. 
      "अण्णा अरं जरा कमी ढोसत जा की अरं तू असा पडला की मला लय भ्या वाटतयं बघ." असं म्हणत अण्णा अन् वैभव दोघेही गळ्यात गळाघालून रडायला लागले. शर्टाच्या बाहीने नाक अन् डोळे पुसत, मुसमुसतचं वैभव म्हाता-या अण्णाला मोठ्या माणसागत समजावून सांगू लागला, "अण्णा अरं आत्ता कुठं मी तिसरीत हाय, मी मोप शाणा हाय, मला जरा तर कळतयं पण.. तू आपल्या बाईकडं तर बघ आता कुठं अंगणवाडीत जात्याय ती.." 
अन् तेवढ्यात इवलीशी बाई दुडुदुडु धावत येऊन अण्णाच्या पांढ र्या  झालेल्या दाढीवर हात फिरवत अण्णाला घट्ट बिलगली व  आपल्या कळकट्ट झालेल्या  फ्राॅकने  त्याचे डोळे पुसू लागली. निरागसपणे हुंदडण्याच्या वयात  दोन्ही लेकरांना अकाली आलेलं शहाणपण बघून अण्णा मनातून पुरता धास्तावून गेला. 
 रकमे.. 'अगं माझा नातू लय शहाणा झालाय. मोठ्या माणसागत बोलायला लागलाय.'  ह्यो पोरगा  मोठा झाल्यावर लय मोठा माणूस होणार हाय बघ अन् माझा सारा पांग फेडणारा हाय.  ह्या दोन लेकराकडं बघून काळीज चिरल्यागत होतयं बघं. आपल्या माघारी देवचं हाय त्यास्नी..आवंढा गिळतं अण्णा म्हणाला.   
     अरं अण्णा  मी लय मोठा होणारं हाय. लय शाळा शिकणार हाय अन् आपल्या बाईला बी मॅडम करणार हाय अन् तवा  तु अन् रकमा आईनं बसून खायाचं बरं का राजाराणीवाणी..नऊ-दहा वर्षाच्या पोराची समज बघून झोपडपट्टीतली सगळी माणसं चाट पडायची. 
    असल्या झोपडपट्टीत जिथं माणसं शिवी शिवाय पाणी पित नायती, दारू पिऊन  तर्रर असत्यात  अर्श्लील शिवीगाळ करत्यात, आई बहन काढल्या शिवाय पाऊल भी पुढं टाकत नायती, जिथं  रात्रंदिवस भांडणाचा तुरंकाळ उठतोय तिथं  या दलदलीत हे  समजदार, हुशार, शांत  काळजी घेणारं कार्ट  ती भी अशा आईच्या पोटी कस निपजलय हे लय मोठं कोडं होतं. 
         एके दिवशी  दुपारीच  वैभव रडत  रडतचं शाळेतून घरी आला.  "रकमा आये ,तू आत्ता च्या आत्ता माझा शाळेत चल बरं सलम्या, येशा मला चिडवाल्याती.  म्हणत्याती की वैभ्याची आई पळून गेल्याय. वैभ्या बिन आईचा हाय, वैभ्याला आईचं नाही." तू लगेचच शाळेत चल मी पण समद्याला दाखवतो की मला भी रकमा आई हाय ते. होय गं रकमा आये मी  बिन आईचा नाही कनाय गं चल न सांग सगळ्यांना की मला भी आई हाय ते.
    रकमा नं चुलीतला जाळ कमी केला व वेडावाकडा हात धूतला. हाताचं पीठ पदरानं पुसतं पुसतंच  लेकराच्या काळजीनं तिनं  वैभव ची शाळा गाठली. रकमा आईला बघून वैभवचा ऊर भरून आला. तो जाम खुश झाला, आनंदानं उड्या मारू लागला. सलम्या व येशाला हाका मारू लागला. "ए सलम्या,ए येशा इकडं या, " बघा की लकानू माझी आई रकमाई शाळेत आल्याय. अन् तुम्ही  म्हणताव की मला आई नाही. बघ ती कोण हाय, आईचं हाय की माझी. 
        रकमाई वैभूच्या वर्गात आली न वर्गात एकच हशा पिकला. सगळी पोरं फिदी फिदी हसू लागली. ए वैभ्याची आई म्हातारी, म्हातारी  म्हणून ओरडू लागली. तेवढ्यात लक्षी  म्हणाली,  "अरे ही  इरकल लुगड्याची म्हातारी हाय ना  ही तर वैभ्या ची आजी हाय, रकमा आई." मॅडम आमची आई बायापशी बोलताना म्हणत व्हती की वैभ्या ची आई पळून गेल्याय. म्या स्वतः ऐकलय. "नाही नाही ए लक्ष्ये ती माझीच आई हाय की वैभव एकदम गुश्यात म्हणाला व तिच्या अंगावर धावून गेला.
      वैभवचा गुस्सा बघून रकमाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या अन् क्षणभर धास्ती ही वाटली. लहानग्या वैभवच्या  भावविश्वात चाललेली खळबळ, त्यांच्या मनाची  होत असलेली घालमेल, आई या शब्दाची त्या अलौकिक नात्या प्रती त्याची  असलेली ओढ  आई बद्दल चे  भावनिक बंध   आणि आई नाही हे ऐकताचं वैभव ची होणारी चिडचिड हे सगळं रकमाला  धास्तावून  सोडणारं होतं. ज्याची तिला भिती वाटत होती तेच वैभवच्या वागण्या बोलण्यातून घडोघडी उचंबळून येत होतं   व त्याचं रूपांतर शेवटी गुश्यात होत असत. व तो आक्रमक होत असे वरचेवर तो अधिकच आक्रमक होत चालला होता. कधी कधी तर तो मित्रांबरोबर मारामारी सुद्धा करायचा. सगळयांनाच त्याची खूप काळजी वाटायची.       
रकमाच्या अनुभवी नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती. ती पुरती हाबकून  गेली होती.  मनातून घाबरून   गेली होती.आईच्या मायेची ऊब तर ती वैभवला देवू शकत नव्हती पण  थोडासा मायेचा ओलावा देवून त्याच्या अस्वस्थ मनाची घालमेल कमी करण्याचा ती  कसो सिनं प्रयत्न करायची. 
     वैभूचा बाप तसा साधाच होता. मिळेल तिथे काम करायचा. कामावरुन येताना पिऊन फुल्ल असायचा. बायको पळून गेली ही सल त्याला बाभळीच्या काट्यागत  सलत होती. त्यामुळे तो नेहमी  नशेत रहाणेच पसंत करायचा. जरा कधी शुद्धीवर असला की टवाळकी त्याला स्वस्थ बसू देत नसे. कधी कधी तर विषय त्याच्या पुरषत्वा  पर्यंत जाई. भानावर असला की तो लेकरांची काळजी घ्यायचा. मुलांना शाळेत ही सोडायला यायचा.त्यांना हवं नको बघायचा
      दोन  तीन दिवस झाले  वैभवच्या वागण्यात बदल जाणवत होता. तो इतर मुलांसोबत धड बोलतही नव्हता, मुलांसोबत खेळत ही नव्हता . गप्प  गप्प बसून रहायचा त्याच्या मनात कसली तरी घालमेल सुरु होती.  सतत हातात एक कसली तरी  वही घेवून बसायचा. त्या वहीमध्ये एक फोटो होता. थोडा वेळ झाला की तो वही उघडायचा व फोटो कडे एकटक बघत बसायचा. व फोटो बघता बघता  टचकन  त्याचे डोळे भरून यायचे.  
    एकदम सुंदर अशी नाकेली, गव्हाळ
 वर्णांची, नीटनेटकी साडी  नेसलेली,लांबसडक केसांची व त्यामध्ये गजरा माळलेली अशी स्त्री त्या फोटो मध्ये दिसत होती. एवढ्या  सुंदर बाईचा फोटो वैभव कडे कसा? न रहावून मॅडम नी वैभवला जवळ बोलावले व विचारले. "वैभव हा फोटो तुझ्या कोणा नातेवाईकाचा आहे का? कोण आहे ही बाई."  मला नाही माहीत ही कोण हाय ते, वैभव गुश्यात म्हणाला. 
अरे मग हा फोटो तू जवळ का ठेवलाय या फोटोतील बाई कोण आहे  आणि सारखं सारखं तू या फोटो कडे एकटक का बघत बसतोस. तू खेळायलाही जात नाहीस.
      मॅडम नी त्याला जवळ घेतलं प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला    जवळ बसवून घेतलं.त्या म्हणाल्या " वैभव खरं सांग मी तुला खूप आवडते ना अगदी तुझ्या रकमा आई एवढी." 'हो' वैभव  म्हणाला. मग मला सांग हा कोणाचा फोटो आहे. आणि तू एवढा का शांत आहेस. तुझे सगळे मित्र तुला खेळायला बोलावत आहेत आणि तू असा गप्प गप्प.  हे ऐकून वैभव एकटक मॅडम कडे पाहू लागला. आता मात्र त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तो  हुंदके देऊन रडू लागला. 
      तो सांगू लागला  " मॅडम  रकमा आई म्हणत व्हती की ही फोटोतली बाई हाय ना ती माझी खरी आई  अश्विनी हाय. मी दोन वर्षाचा व बाई सहा महिन्यांची असताना ती आम्हाला दोघांना पाळण्यात गाढ झोपवून निघून गेली." पुन्हा तो हुंदके देऊन रडू लागला. ती  मला व बाईला का सोडून गेली ओ.. बाई तर केवढी हाय बघा की ..तिला आमची मया कशी आली नसल वो ...तिला भी आमची आठवण येत असेल का हो..असे म्हणून तो अधिकच रडू लागला. त्याच्या  मॅडम ला काय  बोलावं अन् काय करावं हेच सुचत नव्हतं. त्याच्यांही  डोळ्यातून नकळत अश्रू ओघळू लागले. त्याची कशी समजूत काढावी हेच समजत नव्हतं.
     'साक्षात परमेश्वराचा अंश म्हणजे आई', ममत्वाची परमोच्च सीमा म्हणजे आई' सृष्टी तील परमेश्वराची सर्वोच्च निर्मिती म्हणजे आई.'  निस्पृह,निरपेक्ष मायेचा सागर म्हणजे आई.'आज आईसाठी एक कोवळा जीव तींळ तीळ तुटत होता. असं ऐकलं होतं की एक  मुलगा आईचं  काळीज काढून नेत असताना त्याला ठेच लागली तर बाळा जपून,  हो तुला कुठे लागलं तर नाही ना  असं म्हणणारं आईचं काळीज  व आईसाठी धायमोकलून रडणारं तिच्या आठवणीत व्याकूळ झालेला  वैभवचा इवलासा  जीव. पार गलबलून गेल्यागत झाले होते. वैभव च नाही तर त्याच्या सारखी हजारो मुलं व्याकूळ आहेत आपल्या आईची ममतामय ऊब मिळवण्यासाठी, तिच्या प्रेमळ स्पर्शासाठी.
       मॅडमनी  वैभवला जवळ पोटाशी  धरलं. हळुवार पणे धीर देत एक छोटीशी शूर राजकुमार ची गोष्ट सांगितली. गोष्टी तील राजकुमार जसा सर्व संकटावर मात करून जिद्दीने व संयमाने कसा एक  जगप्रसिद्ध राजा झाला तसेच  त्या शूर राजकुमारा सारखं होण्याचं वैभव ने
 मान्य केलं.  त्याची  खूप समजूत घालून त्याच्या बालमनावर झालेले ओरखडे कमी करण्याचा प्रयत्न केला. अण्णा व रकमा आई लेकरांच्या काळजीनं कोलमडून गेले होते. वैभवचा बाप आपल्याच धुंदीत असायचा. 
      रकमा आई आपली आजी हाय व आपली खरी आई दुसरीच कोणतरी  हाय की जी आपल्याला सोडून निघून गेलीय. ही गोष्ट वैभवचा पिछा सोडत नव्हती. कसाबसा तो  या धक्क्यातून स्वतःला  सावरतं होता. आता तो पहिल्या सारखंच आनंदाने वावरत होता. अभ्यासात तर तो अतिशय हुशार होताच त्याचबरोबर नियतीनं त्याला अकाली प्रौढत्वही  बहाल केलं होतं. त्यामुळे तो अगदी                  शहाण्यासारखं वागायचा. सगळया शाळेला त्याचं भारी कौतुक वाटे. 
         घरातही तो सगळी कामं मन लावून करत असे. रकमा आईला मदत करणे, अण्णाची काळजी घेणं, छोट्या बाई ची तर जणू काय तो आईचं झाला होता. अभ्यास करता करता बाईची अंगणवाडी सुटली की तिला जवळ बसवून घेणं, तिचं खाणं पिणं, एवढच काय तर तिची शी-शू सुद्धा तो  न लाजता करायचा. खूप जीव होता त्याचा आपल्या बहिणीवर. सर्व जबाबदा-या तो अगदी मोठ्या माणसांप्रमाणे पार पडत होता. 
       एके दिवशी वैभव शाळेत आला तो नाचत अन् तोंडाने पिपाणी वाजवतच..... पी...पीपी...पी....पीपी...येशा, सलम्या, लक्षे, सुमे अरे ऐकला का पुन्हा एकदा पिपाणी  चा सूर...... वाजवत....पी...पीपी...पी....पीपी.... सगळया पोरांनी वैभव ला गराडा घातला. सलम्या म्हणाला, "काय वैभव सेठ लयच खुश दिसताय , काय म्हैस फळली का शेळीला पाट झाली."  वैभवचं आपलं पिपाणी वाजवण चालूच होतं.
      वैभवला एवढं खुश याआधी कोणीच बघितले नव्हते.  लक्षी न रहावून म्हणाली, "ए  वैभ्या सांग की एवढा का कोकलाय  लागलाय. कुठे तीर मारून आलास." लेका सांग की का एवढी खसखस पिकल्याय, गणू म्हणाला.  लकानू  आधी मला उचलून खांद्यावर तर  घ्या मगच सांगतो बघा  मी का खुश हाय ते. सगळया पोरांनी हुरे....करत वैभवला खांद्यावर उचलून घेतलं  व तोंडाने पिपाणी चा सूर धरत वैभ्या, वैभ्या, वैभ्या म्हणत सगळया  शाळेतनं रपेट मारली. अख्खा वर्ग वैभवच्या आनंदात सहभागी होऊन मनसोक्त नाचत होता. 
      सगळयांचे नाचून झाल्यावर येशा म्हणाला, "सांग की लका तू एवढा का हुरळून गेलाय ते."  बात च तशी हाय लेकानू थांबा थांबा सगळं सांगतो अस म्हणत वैभव ने खिशातून एक बाशिंग काढून दाखवलं. "ए वैभ्या येडा की खुळा अर हे मंडवळ हाय हे लग्नात असतय नवरा नवरीला." लक्षी घाईघाईने म्हणाली.  लका काय लगीन बिगीन करतो का काय सलम्या हसतच म्हणाला. 
   अरे पोरानू माझं लगीन नाही पण आमचा बाप कनाय आम्हाला एक नवी आई घेवून आलाय मंबईला कामाला गेल्यावर. आर त्यांनी लगीन केलय म्हण. नवी टार आई बरं का नाही नाही मम्मी बरं का नव्या आईला मम्मी च म्हणायचं असं आण्णा अन् रकमा आई बी सांगत होती.
     लेकानू ही आमची मम्मी हाय नव्ह लय भारी हाय टी.व्ही. वरच्या बाईवाणीच दिसत्याय बरं का गं  लक्षे. अन् ती छापील लुगडी बी  नेसत्याय. ऐ सलम्या आता मला चिडवू नगसं बर का वैभ्याची आई  म्हातारी म्हणून. नवी मम्मी माझा व बाईचा लाड बी लय करत्याय लका. अन् तिच्या संग तिची एक पोरगी बी  हाय.अरं मला  अजून एक बहिण आली की. आई अन् आण्णा लय खुश हायती. वैभव  नव्या आईबद्दल आनंदाने  भरभरून बोलत होता.  
    वैभव आनंदाच्या भरात नवी मम्मी दाखवायला सगळा वर्गच त्याच्या झोपडीत घेऊन गेला. सगळयांना तिची ओळख करून दिली.  वैभवला एवढं आनंदी बघून सगळेच आनंदून गेले. 
     परंतु हा आनंद वैभवच्या आयुष्यात फार काळ टिकला नाही. नव्याचे नऊ दिवस संपले व नवीन आईने आपले सावत्रपणाचे रंग दाखवायला सुरुवात केली. ती खूप चतुर व आगाऊ बाई निघाली. तिने रकमा आई व आण्णाला घरातून हाकलून दिले. तिने छोट्या बाईचा व वैभवचा भयंकर छळ चालू केला. ती त्यांना जेवायलाही देत नसे. जेवायला मागितल्यावर तिने बाईला चटके दिले. 
     नशीब काळ होवून लेकरांच्या मागे लागलं होतं.  बाप तर असून नसल्या सारखाच होता. म्हणतात ना सख्खी आई नसली की जन्मदाता बाप ही सावत्रच होवून जातो.  दुःखाने होरपळून निघालेला  वैभवचा कोवळा जीव कुठे आपुलकीची फुंकर मिळते का याच शोधात होता. तो आपल्या अश्विनी आईचा फोटो छातीशी धरायचा व छोट्या बाईला कुशीत घेवून रडत रडतच झोपी जायचा. आज तर त्याला आण्णा व रकमा आईची  खूपच आठवण येत होती. रकमा आये कुठं हाय गं तु असं म्हणून धायमोकलून रडत होता. 
      नियतीला काही औरच मान्य होतं.  नेहमीप्रमाणेच  वैभव  रकमा आईला याद करत तिच्या जुन्या लुगड्याचा पदर हातात घेऊन  रडत रडतच झोपी गेला होता. अचानक तो कुत्र्याचं रडणं ऐकून जागा झाला.  अर्धवट झोपेतच डोळे चोळत चोळत  हाड हाड करत उठून कुत्री हाकलू लागला. अंधुक लाइटच्या उजेडात त्याची झोपडी त्याला खूपच सुनसान वाटत होती. तेवढ्यात बाई रडतच उठली. तिला पाणी देण्यासाठी वैभव रांजणाजवळ गेला. त्याला घरात कोणीच नसल्याचा भास झाला. म्हणून त्याने नीट पाहिलं ....घरात बाप, नवी मम्मी कोणीच नव्हतं. अगं आयो...म्हणत तो मटकन खालीच बसला. पप्पा ए पप्पा कुठं हाय रं तू म्हणत तो घराच्या अंगणातही जावून आला.  त्याला कोणीच दिसलं नाही. 
     कसं दिसणार कारण त्याचा जन्मदाता बाप सावत्र आईच्या  सांगण्यावरूनू सोन्यासारख्या दोन लेकरांना पोरकं करून  रात्रीच्या काळोखात कोणालाही न कळू देता मुंबईला  निघून गेला होता. वैभव  पार घाबरून गेला होता. आपलं कसं होणार या विचाराने तो हंबरडा फोडून रडू लागला. ते पाहून छोटी बाई रडायचं बंद झाली व आपल्या फराकाने वैभवचे डोळे पूसू लागली. आण्णा रकमाआये ..म्हणतच  लेकरांनी कशीबशी रात्र काढली.
        नवीन मम्मीच्या येण्यानं सगळं होत्याच नव्हत झालं. इवलेसे जीव रस्त्यावर आले होते. हसण्या- बागडण्याच्या वयात  लेकरांना जगण्याचं ओझं वाटत होतं. जगावर तर कसं आणि कुणासाठी हेच त्यांना कळत नव्हतं. अशातच आण्णा व रकमा आई सुद्धा हाय खाऊन मेल्याची बातमी कळाली. नियतीने सुद्धा क्रौर्याची परिसीमा गाठली होती.
     रोजचा दिवस नवनवीन दुःख कुशीत घेवूनच उगवत होता. सुख म्हणजे नक्की काय असतं? असं म्हणायची वेळ लेकरांच्या वर आली होती. एवढ्या गुणी लेकरांच्या आयुष्यात आलेले चढउतार पाहून सारी झोपडपट्टी हळहळत होती. त्याच्या मॅडम, शाळा, गाव सारे सारे त्यांना मदत करत होती. परंतु त्यांच पोरकेपणाचं दुःख कोणीच वाटून घेवू शकत नव्हतं. 
     अन् एके दिवशी लक्षी,सलम्या, येशा व सगळीच  मुलं  सांगत आली, मॅडम,वैभव चं नाव आपल्या शाळेतून काढून टाका.  "का रे काय झालं? असं का बोलताय, कुठे आहे वैभव?" मॅडम घाबरून म्हणाल्या. एवढ्यात लक्षी धापा टाकत आली व म्हणाली, " वैभ्या च्या घरी काल एक मॅडम आली हुती, ती वैभ्या ला अन् बाईला आपल्या संग घेऊन गेली." कोण असेल ती मॅडम? सगळे विचार कररू लागले. 
       आणि एके दिवशी अचानक  पोस्टमन वैभवची दाखला मागणी घेऊन आला. पुण्यातील एका नामांकित शाळेत वैभवला दाखल केलं होतं.  ते पाहून सगळयांना खूप हायसं वाटलं. त्या दाखला मागणी सोबत वैभवच्या हस्ताक्षरात मॅडमसाठी  एक चिठ्ठी होती. 
    प्रिय मॅडम, मी तुमचा वैभ्या. मी इकडे मजेत आहे. इचारा का म्हणून ते  सांगतो, अहो मी कनाय तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. मग तुम्हाला कळेल मी एवढा का खूश हाय ते.  मला न बाईला ना  माझी अश्विनी आई घेऊन आल्याय पुण्यात. आम्हाला सोडून आल्यावर ती हिकडं लय शाळा शिकल्याय बघा अन् अनाथ मुलांना सांभाळायचा आश्रम भी चालवित्याय. लय मोठी मॅडम हाय माझी अश्विनी आई. आता ती मला अन् बाईला बी लय शाळा शिकविणार हाय. मी लय खुश हाय बघा माझ्या आई जवळ. आम्हाला आमची खरी आई मिळाली, हाय का नाही गंमत.  हे सगळं बघायला आण्णा अन् रकमा आई न्हायती बघा. लय खुश झाली असती ती.  खरं सांगू का मला  तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत्याय. 
              तुमचा वैभव 
     वैभव ने त्याच्या आईचा मोबाईल नंबर ही दिला होता.  चिठ्ठी वाचताना मॅडमच्या गालावर अश्रू ओघळत होते.
 *चिखलात रुतलेले कमळ अगदी देवाच्या चरणावर पडावंअसं झालं होतं. आईच्या सर्व व्याख्या आज वैभवची आई अश्विनी ने पूर्ण केल्या होत्या. तिच्या वर झालेले सगळे आरोप  तिने खोडून काढले होते. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा  अनाथांचा उद्धार करता करता तिने स्वतःच्या मुलांनाही न्याय दिला होता. आणि *जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी* ही उक्ती सार्थ करून दाखवली होती.

   डाॅ. माधुरी भोसले फंड 
  

Comments